Wednesday, December 28, 2011

सोलापुरी शेंगदाणा चटणी

शेंगदाणे, तिखट, मोठ, तिळ, जिरं! चटणीला लागणारं साहित्य सगळं तेच, पण मुळात प्रत्येक वस्तूचा दर्जा आणि करण्याची पद्धत न्यारी यामुळे सोलापुरी शेंगदाणा चटणीला माझ्या खाद्यजीवनात विशेष असं स्थान आहे. या चटणीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही Mixer मधून बारीक केलेली नसून कुटलेली चटणी असते. कुटण्याच्या क्रियेमुळे चटणीला आलेला जाडसरपणा ही सुद्धा ह्या चटणीची खास ओळख! तिला सोलापुरी असं म्हणण्याचं कारण म्हणजे अर्थातच तिचा उगम सोलापूर मध्ये झालेला आहे. हे शेंगदाणे सुद्धा चवीला वेगळे असतात, खास चटणीचे असं म्हणू आपण. आणि हे दाणे लाकडी खलात कुटले जातात.
सोलापूर ची चटणी ही specialty असल्यामुळे ह्या चटणीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक पण ढिगाने आहेत; त्यांच्या कारखान्यात कुटण्याचं काम अर्थातच माणूस नव्हे तर यंत्र करतं; पण तिथेही खल लाकडीच असतात.. त्यामुळे चव घेतल्यावर सामग्री तीच नेहमीची असली तरी चव अशी काही खास असते की वाटीभर चटणी मी अशीच नुसती खाऊन फस्त करू शकते; चिवडा खाल्ल्यासारखी...
नसले यांची सोलापुरी चटणी प्रसिद्ध आहे, पण सोलापूर मध्ये अश्या अनेक घरगुती कंपन्या आहेत. नसलेंची चटणी पुण्यात देसाई बंधुंकडेही मिळते. त्यामुळे फक्त त्यासाठी  all the way सोलापूर ला जायची गरज नाही. पण अर्थात, सोलापूरची ज्वारीची भाकरी(ज्वारी हे मुख्य पिक असल्यामुळे सोलापुरी ज्वारीलाही खास चव असते) आणि त्या बरोबर शेंगदाण्याची चटणी, बेसनाचे पिठले, वांग्याची भाजी अन दही, या झकास मेनू चा आस्वाद घ्यायचा असल्यास सोलापूरला जाणेच उत्तम!


- अदिती 

No comments:

Post a Comment